खेड: २०१९ च्या निवडणुकीतील बेकायदेशीर रॅली प्रकरणात माजी आमदार संजय कदम व वैभव खेडेकरसह ३३ जणांची निर्दोष मुक्तता
आचारसंहितेचे उल्लंघन प्रकरण; प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांचा निर्णय
खेड – २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर बेकायदेशीर रॅली काढून आचारसंहितेचे व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी गुरुवारी सुनावला. संशयितांच्या वतीने ॲड. अश्विन भोसले यांनी युक्तिवाद केला.
२०१९ मध्ये संजय कदम विधानसभा निवडणुकीत उमेदवार होते. २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना व मतदानानंतर, संजय कदम, वैभव खेडेकर व कार्यकर्त्यांनी चारचाकी व दुचाकींवरून कर्णकर्कश हॉर्न वाजवत रॅली काढली होती. भरणे येथील काळकाई मंदिराजवळ रात्री ८.३० वाजता पोलिसांनी रॅली थांबवण्याचा प्रयत्न केला असता, संजय कदम यांनी “रॅली काढणारच, गुन्हा दाखल करायचा तो करा” असे पोलिसांना सुनावले होते.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात एकूण ३३ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात संजय कदम, सायली संजय कदम, साहिल संजय कदम, वैभव खेडेकर, अजय रमेश पिंपरे, तौसिफ शौकत सांगले, प्रमोद पांडुरंग जाधव, धीरज सुनील कदम, ओंकार प्रकाश कदम, पंकज पांडुरंग जाधव, दादू नांदगांवकर, स. तू. कदम, सुनील दत्ताराम चव्हाण, प्रसाद कदम, विनोद तांबे, विजय जाधव, सुरेश मोरे, राहुल कोकाटे, बाबा मुदस्सर, प्रकाश शिगवण, सतीश वसंत कदम, सचिन जाधव, इम्तियाज खलिफ, प्रदोष सावंत, चेतन धामणकर यांचा समावेश होता.
या खटल्यात एकूण २८ साक्षीदारांची तपासणी झाली. ॲड. भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.
#️⃣ हॅशटॅग्स:
#खेड #संजयकदम #वैभवखेडेकर #मनसे #निर्दोषमुक्तता #२०१९निवडणूक #आचारसंहिता #रत्नागिरीबातम्या