रस्ते अडवा, विकास थांबवा! पागांरी तर्फे हवेली–सडेवाडी–भुरकुंडा रस्त्यावर सरपंचांचा अडथळा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

रस्ते अडवा, विकास थांबवा!

पागांरी तर्फे हवेली–सडेवाडी–भुरकुंडा रस्त्यावर सरपंचांचा अडथळा

 

तळवली (मंगेश जाधव वार्ताहर):

गुहागर तालुक्यातील पागांरी तर्फे हवेली–सडेवाडी–भुरकुंडा ग्रामीण मार्ग क्रमांक ५४ या महत्त्वाच्या रस्त्यावर ग्रामपंचायतीचे सरपंच नुर महमद दळवी यांनी दगडी बांध घालून रस्ता अडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

या रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या कामाला सुरुवातीपासूनच पागांरी तर्फे हवेली ग्रामपंचायतीचे सरपंच नुर महमद दळवी यांनी विरोध दर्शवला असून, हा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

या अन्यायकारक भूमिकेविरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित पोलीस ठाण्यात लेखी निवेदने सादर केली आहेत. या रस्त्यासाठी भाजपचे केदार साठे तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. मात्र, ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सरपंच असलेले नुर महमद दळवी हे विकासकाम करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सरपंच दळवी यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर जांभा दगड रचून रस्ता पूर्णतः बंद केल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ता बंद झाल्यामुळे दैनंदिन वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची ये-जा यावर गंभीर परिणाम होत असून ग्रामस्थांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे.

 

या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे व रस्ता खुला करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]