एसटी कर्मचाऱ्यांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; महागाई भत्ता ५८%, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ लागू; ८६ हजार कर्मचाऱ्यांना फायदा, २९ जूनचे आंदोलन मागे
मुंबई | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे. ही घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात केली.
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवेला शासनाने योग्य न्याय दिला आहे.
नवीन निर्णयानुसार महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून अनुक्रमे १०-२०-३० टक्के करण्यात आला असून, वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे ५,६४९ कोटी रुपयांच्या देयकांसाठी शासन आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
या निर्णयानंतर कर्मचारी संघटनांनी २९ जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेतले आहे. हा निर्णय शासन आणि एसटी कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
एसटीचे चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा हा सन्मान असून, कर्मचारी समाधानी असतील तर लालपरी अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि कार्यक्षमतेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
SEO Keywords :
एसटी कर्मचारी, ST कर्मचारी वेतनवाढ, महागाई भत्ता ५८ टक्के, घरभाडे भत्ता वाढ, प्रताप सरनाईक, महाराष्ट्र एसटी महामंडळ, महायुती सरकार, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा, ST News Maharashtra, MSRTC News












