गुहागर बस डेपोवर युवासेनेचा धडक मोर्चा; विद्यार्थ्यांच्या बससेवेतील गैरसोयी तातडीने दूर करण्याची मागणी
बस उशिराने येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; डेपो व्यवस्थापकांकडून सुधारणा करण्याचे आश्वासन
आबलोली | संदेश कदम
गुहागर तालुक्यात विद्यार्थ्यांना बससेवेच्या अनियमिततेमुळे होत असलेल्या गैरसोयींच्या पार्श्वभूमीवर युवासेना गुहागरच्या वतीने गुहागर बस डेपो येथे धडक देत डेपो व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले. बस वेळेवर न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा यावेळी ठळकपणे मांडण्यात आला.
युवासेनेने विशेषतः वाडदई परिसरातील विद्यार्थ्यांना बस उशिरा पोहोचत असल्याने त्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नसल्याची समस्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर युवासेना कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावर डेपो व्यवस्थापकांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बससेवेत यापुढे कोणतीही दिरंगाई होणार नाही, तसेच वेळापत्रकानुसार बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी युवासेना गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख सागर गुजर, शहरप्रमुख श्रमिक भाटकर, उपतालुकाप्रमुख कुणाल देसाई, विभागप्रमुख समीर महाडिक, रविराज नागवेकर, विनायक कांबळे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.










