इळये प्राथमिक आरोग्य केंद्रात जलसुरक्षकांना पाणी गुणवत्तेबाबत प्रशिक्षण
शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी जलसुरक्षकांना मार्गदर्शन
देवगड | प्रतिनिधी : प्रज्वल गायकवाड | दि. ११ ऑगस्ट २०२६
इळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील जलसुरक्षकांसाठी पाणी गुणवत्ता व सुरक्षित पिण्याचे पाणी याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, इळये येथे घेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणास आरोग्य सहाय्यक सखाराम गुरखे, उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता हर्षदा बोथीकर, समूह समन्वयक विनायक धुरी आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान गावातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसुरक्षकांची भूमिका, पाण्याची गुणवत्ता तपासणी, पाणी दूषित होण्याची कारणे तसेच पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करून पाणी गुणवत्तेबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच स्वच्छता सर्वेक्षण, पाणी नमुना तपासणी आणि WQMIS प्रणालीमध्ये पाणी नमुन्यांची नोंदणी याबाबतही जलसुरक्षकांना माहिती देण्यात आली.
पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढत असल्याने पाणी स्रोतांचे नियमित शुद्धीकरण व पाणी गुणवत्तेची तपासणी करणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे जलसुरक्षकांना पाणी गुणवत्ता तपासणीसंदर्भातील आवश्यक तांत्रिक माहिती मिळाली असून, गावातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे.










