रत्नागिरी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवात गुहागरच्या संयुक्ता मोरे यांचा प्रथम क्रमांक
‘वाफवलेला थ्री लेयर पिझ्झा’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू; रानभाज्यांचा कल्पक वापर करत पाककला स्पर्धेत मिळवले यश
गुहागर (सचिन कुळये, तवसाळ) : रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव व रानभाजी महोत्सवातील पाककला स्पर्धेत गुहागर तालुक्यातील नरवण गावच्या सौ. संयुक्ता विशाल मोरे (धरणवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी तयार केलेल्या ‘वाफवलेल्या थ्री लेयर पिझ्झा’ या अभिनव पदार्थाला परीक्षकांकडून विशेष पसंती मिळाली.
सौ. संयुक्ता मोरे या नरवण ग्रामपंचायतीच्या सदस्या असून विविध पाककला व सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेत असतात. यापूर्वीही त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांचा अनोखा संगम
संयुक्ता मोरे यांनी तयार केलेल्या थ्री लेयर पिझ्झामध्ये तांदळाचे पीठ, नाचणीचे पीठ यांसह भारंगीची भाजी, टाकळ्याची भाजी, फोडशीची भाजी, टोमॅटो, लिंबू, काकडी आणि विविध चवदार मसाल्यांचा वापर करण्यात आला होता. पारंपरिक रानभाज्यांचा आधुनिक पाककृतीमध्ये कल्पक पद्धतीने केलेला वापर या पदार्थाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
रानभाज्यांचे महत्त्व, पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील वापर आणि स्थानिक खाद्यसंस्कृती याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पर्यावरणप्रेमी, नागरिक तसेच खाद्यप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
या स्पर्धेतील विजेत्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार डॉ. उदयजी सामंत, आमदार किरणजी सामंत तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती श्री. महेशजी नाटेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
गुहागर तालुक्यातील नरवण गावच्या सौ. संयुक्ता मोरे यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.










