पत्नीच्या निधनानंतर मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीचा खाडीत मृत्यू
खेड तालुक्यातील पन्हाळजे दर्गा जेटी परिसरात आढळला ५७ वर्षीय किशोर मेढेकर यांचा मृतदेह; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
रत्नागिरी : खेड तालुक्यातील पन्हाळजे भोईवाडी येथील किशोर हरी मेढेकर (वय ५७) यांचा मृतदेह पन्हाळजे दर्गा जेटी परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
किशोर मेढेकर हे शेळीपालनाचा व्यवसाय करत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ते इतरांशी फारसे बोलत नसत.
रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्यापूर्वी पन्हाळजे दर्गा जेटी परिसरातील खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.











