साटवली शाळेच्या बेकायदेशीर बसप्रकरणी मुख्याध्यापकांचा बनाव उघड; विद्यार्थी व पालकांच्या प्रतिज्ञापत्राने पोलखोल!
RTO कडे ‘गाडी बंद होती’ असा खोटा दावा करणाऱ्या शाळा प्रशासनाचा भांडाफोड; उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी
लांजा प्रतिनिधी -जितेंद्र चव्हाण
साटवली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील रा. सी. बेर्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संस्था-मालकीच्या शालेय वाहनाच्या (गाडी क्र. MH 08 AP 4539) बेकायदेशीर आणि सुरक्षेशी खेळणाऱ्या वाहतुकीबाबत रोज नवे व धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तक्रारदाराला आणि RTO अधिकाऱ्यांना “मागील ६ महिने गाडी बंद होती” असे खोटे उत्तर देणाऱ्या मुख्याध्यापक व संस्था प्रशासनाचा बनाव प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या संयुक्त प्रतिज्ञापत्रामुळे पुरता उघडा पडला आहे.
नेमके प्रकरण काय?
जून २०२६ मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एसटी बस अवघ्या ५ ते ६ दिवसांत बंद झाली. त्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना ने-आणीसाठी स्वतःच्या मालकीच्या वाहनाचा (MH 08 AP 4539) नियमित वापर सुरू केला. परंतु, २९ सप्टेंबर २०२६ रोजी मोटार वाहन निरीक्षक (RTO) यांनी केलेल्या तपासणीत या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र (Fitness Certificate), विमा (Insurance) आणि पासिंग (Passing) मुदत संपलेली असल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहनाला ‘शाळा परिवहन समिती’ची परवानगी, स्कूल बस परवाना व बॅजधारक चालकही नव्हता.
माहिती अधिकार आणि RTO तपासात मुख्याध्यापकांचा विरोधाभास
तक्रारदार श्री. जितेंद्र सुरेश चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर २४ ऑक्टोबर रोजी शाळेने RTO ला उत्तर देताना “इन्शुरन्स, पासिंग व चालकाचा बॅज नसल्याने आम्ही गाडी वापरत नाही, तक्रार होईपर्यंत हे वाहन उभे होते” असा दावा केला. तसेच माहिती अधिकारात “शाळा परिवहन समितीच अस्तित्वात नाही” अशी लेखी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी गंभीर तडजोड केल्याचे कबूल केले.
१७ विद्यार्थी व पालकांच्या सह्यांनी मुख्याध्यापकांचा दावा ठरला खोटा!
मुख्याध्यापकांचा हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. तक्रार अर्जासोबत संबंधित गाडीतून नियमित प्रवास करणाऱ्या १७ विद्यार्थ्यांच्या सह्या आणि त्यांच्या पालकांच्या सह्यांचे संयुक्त प्रतिज्ञापत्र (साक्ष-निवेदन) जोडण्यात आले आहे. यामध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उघडपणे नमूद केले आहे की, “तक्रार दाखल होईपर्यंत आमची मुले याच गाडीतून नियमितपणे शाळेत ये-जा करत होती”. यामुळे RTO आणि शिक्षण अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या मुख्याध्यापकांचे पितळ उघडे पडले आहे.
अनधिकृत चालक आणि संस्थेच्या उपाध्यक्षांची मुजोरी
तक्रार दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही हे बेकायदेशीर वाहन नियमितपणे चालवण्यात आले. विशेष म्हणजे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. महेंद्र शंकर नारकर हे स्वतः गंभीर गुन्हे नोंद असतानाही हे अनधिकृत वाहन चालवून विद्यार्थ्यांची वाहतूक करत होते, अशी गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी आणि RTO कडे प्रमुख मागण्या:
मूळ तक्रारदार श्री. जितेंद्र सुरेश चव्हाण यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), गटशिक्षणाधिकारी व लांजा पोलिसांकडे निवेदनाद्वारे खालील कडक मागण्या केल्या आहेत:
सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक तपासणी: शाळेतील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तातडीने ताब्यात घेऊन डिजिटल पुरावे डिलीट केले जाण्याची शक्यता लक्षात घेता तांत्रिक तपासणी करण्यात यावी.
निपक्ष चौकशी समिती: स्थानिक पातळीवर चौकशी न करता जिल्हास्तरीय वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी समिती गठीत करावी.
कायदेशीर कारवाई: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी व अनधिकृत चालकांवर नियमानुसार शिस्तभंग आणि कायदेशीर कारवाई व्हावी.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ आणि प्रशासनाला दिलेली चुकीची माहिती यामुळे साटवली पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त होत असून आता शिक्षण विभाग व RTO प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











