विरारमध्ये प्रथमच रंगणार कोकणच्या जाखडीचा अनोखा कलाविष्कार!
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
कोकणच्या मातीत रुजलेली पारंपरिक कलगी-तुरा अर्थात जाखडी नृत्यकला आता विरार नगरीत नव्या स्वरूपात प्रथमच रंगणार आहे. तळवली (डावळवाडी), ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील ‘श्री गजानन नृत्य कला अविष्कार’ यांच्या माध्यमातून या लोककलेचा पारंपरिक बाज जपत नावीन्यपूर्ण कलाविष्कार रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. कलगी-तुरा कोकणच्या लोकजीवनाशी जोडलेली सांस्कृतिक परंपरा आहे.गीत, संगीत, अभिनय, नृत्य आणि प्रबोधन यांचा सुंदर संगम असलेली कोकणची समृद्ध लोककला आहे. पारंपरिक गीतांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक विषय मांडण्याची परंपरा या कलेने आजवर जपली आहे.
याच पारंपरिक कलेला आधुनिक सादरीकरणाची जोड देत श्री गजानन नृत्य कला मंडळाच्या संकल्पनेने या जाखडीत एक वेगळेपणा निर्माण करून विविध आकर्षक सोंगे,पात्रांचे अभिनय, नृत्य, सुरेल गीत-संगीत आणि देखावे यांचा संगम या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पारंपरिक जाखडीच्या ठेक्यासोबतच रसिकांना मनोरंजन आणि नावीन्यपूर्ण रंगमंचीय अनुभवाची पर्वणी मिळणार आहे.परंपरेचा गाभा जपत नव्या पिढीपर्यंत लोककला पोहोचवण्याचा हा प्रयत्न असून, कोकणची ही वैशिष्ट्यपूर्ण कला मुंबई विरारमध्ये सादर होणे ही कोकणवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
हा अनोखा कलाविष्कार मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता, ऋषिविहार कॉम्प्लेक्स फेज-१, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व येथे रंगणार आहे. कोकणच्या मातीतला कलगी-तुऱ्याचा अस्सल ठेका आणि नावीन्यपूर्ण सादरीकरणाचा अनुभव घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












