# महत्त्वाच्या बैठकीला नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची दांडी; उदय सामंत संतापले!
“जनतेची कामे होत नसतील, तर अधिकार काढून घेण्यासाठी मला एक मिनिटही लागणार नाही”; विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचा सज्जड इशारा
**रत्नागिरी :- विशेष कार्यकारी अधिकारी हे मानाचे पद आहे. मात्र, या पदाचा गैरवापर करून स्वतःला मोठे शासकीय अधिकारी समजण्याची चूक करू नका. जनतेची कामे न करणाऱ्या आणि महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी मला एक मिनिटही लागणार नाही, असा सज्जड इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. त्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीला काही नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्याचा वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
निवडणुकीच्या काळात पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखले व कागदपत्रांच्या प्रती मिळवताना होणारा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, काही नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दरवर्षी नेमकी कोणती कामे केली, याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. घराघरांत जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. या सर्व कामांचा वार्षिक अहवाल सादर करणे बंधनकारक असेल, असेही सामंत यांनी सांगितले.
केवळ पदाचा गैरवापर करून पक्षाची अथवा पदाची बदनामी करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. जुन्या प्रलंबित याद्यांमधील कामे पूर्ण करून नवीन कार्यकर्त्यांनाही संधी आणि न्याय दिला जाईल. विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा उपयोग केवळ पदापुरता मर्यादित न राहता पक्षवाढीसोबतच जनसामान्यांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.











