आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे येथे कवी बसवंत थरकार यांचा, विजय वडवेराव यांच्या हस्ते सन्मान
नवी मुंबई (मंगेश जाधव)
एस एम जोशी सभागृह गाजवे चौक नवी पेठ पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये सेवा निवृत्त मुख्याध्यापक तथा कवी बसवंत थरकार यांचा आयोजक भिडेवाडाकार कवी शिक्षक विजय वडवेराव यांच्या हस्ते संविधान ग्रंथ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व फुलेप्रेमी लिहिलेला पेन देऊन सन्मान करण्यात आला.
येथे २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ चार दिवस सहाशे कवी कवयित्रींच्या उत्स्फूर्त सहभागाने चाललेल्या पुणे फेस्टिवल मध्ये दररोज चर्चा सत्र, एकपात्री प्रयोग, एकांकिका, दांडपट्टा, लाठीकाठी, ज्युदो कराटे प्रात्यक्षिक, पोवाडा व दररोज सुमारे शंभर हून जास्त कवितांचे सादरीकरण तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हे, अन्य राज्ये त्या मध्ये गोवा, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गजरात व दुबई येथील कवींचा सहभाग व भरगच्च कार्यक्रम असल्याने ” आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२५” खूपच गाजले. याची दखल विविध भाषांचे प्रिंट मिडिया तसेच विविध चॅनेलवाले प्रतिनिधींनी, पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित होते.
येथील फुले फेस्टिवल मध्ये कवी बसवंत थरकार यांनी भिडे वाड्यातील पहिली मुलींची शाळा या विषयावर “साऊ ज्योतीची बोलली” ही कविता सुरेल आवाजात गाऊन सादर केली. यास उपस्थित काव्य रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कवितेतून त्यांनी फुले दांपत्याचे शैक्षणिक – सामाजिक कार्य तसेच त्यामुळे समाजात झालेले परिवर्तन यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
आयोजक विजय वडवेराव यांनी उपस्थितांसाठी स्वखर्चाने उत्तम सभागृह उपलब्ध करून दिले होते तसेच कवींकडून कोणतेही शुल्क न घेता स्वखर्चाने चारही दिवस सकाळी चहा नाश्ता व दुपारचे स्वादिष्ट जेवण दिले होते. प्रत्येक वेळी विचार पिठावर कविता सादर करणारे दहा-बारा कवी असायचे. तेच त्या गटाच्या सादरीकरणाचे अध्यक्ष असायचे. त्या मुळे येथे सर्वांना वेगळेपण अनुभवता आला. अशा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये आपला सन्मान झाला हे आपले भाग्यच समजतो तसेच असे कार्यक्रम वारंवार झाले तर ज्या पुणे शहरातील भिडे वाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज़ोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली. तसेच त्यांचे सामाजिक कार्य सर्व दूर पोहोचायला मदतच होईल असे मत व्यक्त केले.