मोफत नेत्र आणि आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नेत्र आणि आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद

 

शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई, तरुण उत्साही सेवा मंडळ आणि माघी गणेशोत्सव मंडळ यांचा उपक्रम

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई, तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) आणि माघी गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बी. डी. डी .चाळ, २६/२७ मारुती मंदिर, सखुबाई मोहिते मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, डिलाइल रोड येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र शिबिराला ११ जानेवारी २०२५ रोजी उत्तम प्रतिसाद लाभला.

 

सदर नेत्र शिबिराला रहिवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. १७५ हून अधिक रुग्णांनी उपस्थित राहून मोफत सेवांचा लाभ घेतला. या शिबिरात संगणकीकृत दृष्टी चाचण्या, मोतीबिंदू चाचण्या आणि मधुमेह रेटिनोपॅथी चाचण्यांसह विविध सेवा देण्यात आल्या.

 

शिबिरात सहभागी झालेले रुग्ण सर्व वयोगटातील होते आणि त्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ डोळ्यांची तपासणी न केलेले, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर मोठ्या आजारांनी ग्रस्त असलेले, काचबिंदू किंवा रेटिनाच्या समस्या असलेले रुग्ण यांचा समावेश होता.

 

मुंबई येथील शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटमध्ये रुग्णांना उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये संपूर्ण डोळ्यांची तपासणी, नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांसाठी मोफत तपासणी, शस्त्रक्रिया तसेच औषधे आणि चष्म्यांवर सवलत यांचा समावेश होता.

 

तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) आणि माघी गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख सल्लागार देवदास सावर्डेकर, अध्यक्ष अरुण चिपळूणकर, कार्यकारी अध्यक्ष स्वप्नील इनरकर, चिटणीस शांताराम तुरळकर, उपचिटणीस महेंद्र सावर्डेकर, खजिनदार हरिश्चंद्र तुरळकर, हिशोब तपासणीस सागर जामसुतकर यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने शिबिराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. “रहिवाशांकडून इतका मोठा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे,” असे श्री. चिपळूणकर म्हणाले. “आमचे ध्येय गरजूंना दर्जेदार नेत्र सेवा प्रदान करणे आहे आणि शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या सहकार्याने हे साध्य करण्यात आम्हाला यश आले याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

 

शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबईचे आऊटरिच हेड प्रशांत नाईक, वरिष्ठ कार्यकारी सचिन कुराडे, व्होकार्ट मार्केटिंगचे अभि भिंगार्डे, डॉ. दीपाली रूपनर आणि इतर अनेक समर्पित सदस्यांच्या चमूने शिबिराचे सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि सर्व रुग्णांना आवश्यक लक्ष आणि काळजी मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) आणि माघी गणेशोत्सव मंडळाचे मिलिंद सुसवीरकर, भावेश सासिया, आदिष नेवरेकर, रोहित तुरळकर, दत्ताराम वायंगणकर, प्रणित चिपळूणकर आणि सदस्यांमुळे शिबिराला लाभलेल्या भव्य यशामुळे आयोजकांना त्यांच्या पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बळ मिळाले आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...