कोकणचे बुद्धिवैभव नव्या पिढीने समजून घेणे महत्त्वाचे- प्रकाश देशपांडे

देवरुख– ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष प्रकाशजी देशपांडे यांनी कोकणात जन्मलेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर अलौकिक कार्य केलेल्या लोकोत्तर व्यक्तित्वांची ओळख आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना करून दिली.
बाजीराव पेशव्यांपासून झाशीची राणी, लोकमान्य टिळक, लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळंकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सर्वात पहिले शैलचित्रे शोधणारे हरिभाऊ वाकणकर, पहिले वृत्तपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, समतानंद गद्रे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, गोळवलकर गुरुजी, सार्वजनिक काका, कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन, भागोजीशेठ किर, हमीद दलवाई, पिनकोड द्वारे देशातल्या प्रत्येक गावाला ओळख देणाऱ्या श्री. वेलणकर यांच्यापर्यंत अनेक रथी महारथीची, त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख ओघवत्या शैलीत करून दिली. कोकणच्या या बुद्धिवैभवातून विद्यार्थ्यांनी स्फूर्ती घ्यावी.’ असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी कोकणातील या लोकनेत्यांचे कार्य अत्यंत स्फूर्तिदायी आहे. या व्यक्तिमत्वांच्या कार्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी समाज व राष्ट्रोपयोगी कार्य करावे असा संदेश याप्रसंगी दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी प्रकाश देशपांडे यांची ओळख करून दिली आणि प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा स्नेहलता पुजारी, प्रा. अजित जाधव, प्रा. सुनील सोनवणे आदी प्राध्यापकांसह सहाय्यक स्वप्निल कांगणे आणि रोशन गोरुले यांनी मेहनत घेतली.