देवरूख एसटी आगारात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे निदर्शन आंदोलन
रा. प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

देवरूख – संगमेश्वर तालुक्यातील देवरूख एसटी आगारात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राष्ट्रीयीकृत परिवहन (रा. प.) कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी बुधवारी (दि. ६ मार्च) निदर्शन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कामगारांनी जोरदार घोषणा देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यांमध्ये दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत थकित वेतन त्वरित अदा करणे, प्रवासी भाडेवाढ पूर्वीप्रमाणे ५ रुपयांच्या पटीत करून सुधारित भाडेवाढ करणे, कार्यशाळांना आवश्यक स्पेअरपार्टचा पुरवठा करणे, भविष्य निर्वाह निधीतून कामगारांना त्वरीत उचल देणे आणि अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन सुधारीत शिस्त आवेदन पद्धत लागू करणे यांचा समावेश आहे.
संघटनेचे अध्यक्ष एस. बी. कांबळे, सचिव व्हि. बी. जाधव, खजिनदार ए. ए. घोंगडे, तसेच समीर शिंदे, संदेश रेडीज आणि अन्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी एकत्र येत प्रशासनाला इशारा दिला की, मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.
या आंदोलनामुळे देवरूख आगार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अद्याप प्रशासनाने यावर कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. पुढील काळात कामगारांच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.