जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न – पाचेरी सडा येथे भव्य महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ

गुहागर, 8 मार्च 2025: तालुक्यातील पाचेरी सडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील प्रत्येक वाडीतून सुमारे 200 हून अधिक महिलांनी या भव्य कार्यक्रमात सहभाग घेतला. महिलांसाठी आयोजित झालेला हा पहिलाच असा भव्य समारंभ असल्याने विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाच्या आयोजनात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका आणि ग्रामसंघ अध्यक्षा यांचा पुढाकार होता. प्रमुख पाहुणे म्हणून त्रिमूर्ती सेवा ग्राम विकास मंडळाचे सचिव श्री. संतोष आंब्रे, खजिनदार श्री. अनिल जोशी, मुंबई अध्यक्ष श्री. कृष्णा पंडये, मंडळाचे कार्यकर्ते विजय डिंगणकर, संजय डिंगणकर, आशिष मोरे, तसेच ग्रामसेवक श्री. पावरा साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रमुख वक्त्या माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवलीच्या शिक्षिका श्रीमती नीलम शांताराम वाघे यांनी महिलांना विविध क्षेत्रांत पुढे येऊन आपला ठसा उमटवण्याची प्रेरणा दिली. गावातील महिलांनीही आपल्या मनोगताद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण:
महिलांसाठी आयोजित उखाणे स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. लहानथोर महिलांनी उत्साहाने यात भाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच श्री. संतोष आंब्रे (भाऊ) यांनी केले. शेवटी सर्व महिलांना हळदीकुंकू आणि अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाने गावातील महिलांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळाली. गावातील पुरुषांनी महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. हा समारंभ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Author: Sujit Surve
Sujit surve * Ratnagiri vartahar* Media creators