ब्रेकिंग न्यूज: मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर टीसीची आत्महत्या; धावत्या मालगाडीसमोर उडी घेऊन जीवन संपवले
अकोला: मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीस (टीसी) सुमेध मेश्राम (वय 40) यांनी मालगाडीसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती तणावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमेध मेश्राम हे फलाट क्रमांक १ वर कर्तव्य बजावत असताना अचानक भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर झेपावले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि मुर्तिजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली असून सहकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी घरगुती तणावातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुढील तपास मुर्तिजापूर पोलीस करीतआहेत.