मुंबई पोलीस आता अधिक ‘स्मार्ट’: सायबर सुरक्षेसह विविध उपक्रमांचे भव्य उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘उत्कर्ष सभागृह’, सायबर लॅब्स व हेल्पलाईन सुविधांचे लोकार्पण
मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र पोलीस दल आता आणखी ‘स्मार्ट’ बनले असून, मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध नागरिकाभिमुख व तंत्रस्नेही उपक्रमांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या वेळी सायबर सुरक्षेच्या दिशेने उचललेल्या ठोस पावले, पोलीस ठाण्यांची सुधारणा व महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘भरोसा सेल’चा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमात ‘राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 1930’ संदर्भातील जनजागृतीसाठी चित्रफित तयार करणारे साहिल कृष्णानी आणि ‘उत्कर्ष सभागृह’ाच्या सौंदर्यीकरणात योगदान दिलेले अता ऊर शेख यांचा विशेष सन्मान केला.
100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत राबवण्यात आलेल्या नागरिक केंद्रित सुधारणांचे कौतुक करताना, मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस ठाण्यांमध्ये स्वच्छता आणि महिला पोलिसांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘भरोसा सेल’ आणि पीडित महिलांसाठीच्या व्हॅन्सच्या माध्यमातून महिलांना त्वरित मदत मिळत आहे.
सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 अत्याधुनिक सायबर लॅब्स सुरू करण्यात आल्याची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “आर्थिक फसवणूक, खंडणी व लैंगिक शोषण यांसारखे गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. त्यावर तातडीने कारवाईसाठी 1930 (राष्ट्रीय) आणि 1945 (राज्यस्तरावरील) हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहेत. भविष्यात एकत्रित हेल्पलाईनचा विचार केला जाईल.”
नवीन फौजदारी कायद्यांमुळे भारतीय न्यायव्यवस्थेच्या कामकाजात बदल घडून येणार असून, मिशन कर्मयोगी अंतर्गत पोलीस दलाला नव्या कायद्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी राज्यमंत्री योगेश कदम, वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
#मुंबईपोलीस #स्मार्टपोलिसिंग #सायबरसुरक्षा #देवेंद्रफडणवीस #उत्कर्षसभागृह #MissionKarmyogi #CyberCrimeHelp #Helpline1930 #MumbaiNews #RatnagiriVartahar















