माझी बातमी करा
—
???? माखजन शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष शशीशेखर भागवत यांचे निधन
हृदयविकाराच्या झटक्याने निधन; शिक्षण व छायाचित्रण क्षेत्रात मोलाचे योगदान
संगमेश्वर तालुक्यातील सरंद गावचे रहिवासी आणि माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष शशीशेखर रमाकांत भागवत (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक कार्यसमर्पित व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
शशीशेखर भागवत यांनी अध्यक्षपद भूषवताना संस्थेच्या माध्यमिक शाळेला कनिष्ठ महाविद्यालय जोडून १९९५ च्या सुमारास ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या नावलौकिकात भर पडली. अध्यक्षपदाबरोबरच संचालक म्हणूनही त्यांनी संस्थेची सेवा केली.
सरंद ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून त्यांनी ग्रामीण प्रशासकीय कार्यातही सहभाग घेतला होता. ते एक कुशल छायाचित्रकार होते. जुनी मॅट्रिक झाल्यावर मुंबई दूरदर्शनसाठी त्यांनी छायाचित्रकार म्हणून काम केले. सरंद येथील लक्ष्मी नारायण देवावर त्यांची नितांत श्रद्धा होती.
भागवत यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
बातमी साभार -प्रकाश पेंडसे माखजन
—
#शशीशेखरभागवत #माखजनशाळा #संगमेश्वर #शिक्षणसेवा #सरंदगाव #रत्नागिरी #दुःखदवृत्त
फोटो















