मुसळधार पावसाचा रायगड जिल्ह्याला तडाखा; मुरुडमध्ये २४ तासांत ३७१ मिमी पावसाची नोंद!
श्रीवर्धन, म्हसळा, मुरुडमध्ये अतिवृष्टी; जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प
अलिबाग | प्रतिनिधी — मान्सूनच्या आगमनाआधीच रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसला असून, मागील चोवीस तासांत मुरुड येथे तब्बल ३७१ मिमी, श्रीवर्धनमध्ये ३०८ मिमी, आणि म्हसळा तालुक्यात ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय माथेरान (१८१ मिमी), रोहा (१६६ मिमी), आणि सुधागड (१०४ मिमी) मध्येही दमदार पावसाची नोंद झाली आहे.
या अतिवृष्टीमुळे कुंडलिका, पाताळगंगा, आंबा व सावित्री नद्यांचे पाणीपातळी वाढली आहे. काही भागांत लहान नाले ओसंडून वाहत असून, रस्ते, वाहतूक आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.
वाहतूक ठप्प आणि पर्यायी मार्गांची गरज
किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर कोझर येथे मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. माणगाव-घोणसे घाट मार्गे प्रवास करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
म्हसळा-गोरेगाव मार्गावर खामगाव येथे झाड पडल्यामुळे आणि पेण-खोपोली मार्गावर साजगाव येथे भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सध्या साजगाव मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मुरुडमध्ये अनधिकृत बांधकामामुळे पूरपरिस्थिती
मुरुड शहरातील दत्त मंदिर परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे नैसर्गिक नाले अडवल्याने पाणी घरात घुसल्याचे स्थानिकांनी सांगितले. डोंगर फोडून भराव टाकल्यामुळे पावसाचे पाणी थेट पायऱ्यांमार्गे खाली उतरत आहे.
अलिबाग, उरण, महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा परिसरात विजांच्या कडकडाटासह संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दमखाडी परिसरात रस्त्यावर पाणी साचले असून, नागरिकांच्या हालाखी वाढल्या आहेत.
—
#रायगडपाऊस #मुरुड #श्रीवर्धन #म्हसळा #मुसळधारपाऊस #वाहतूकठप्प #अनधिकृतबांधकाम #RatnagiriVartahar
फोटो















