रत्नागिरीत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलचा प्रसूतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू, बाळही वाचले नाही!
रत्नागिरी: पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलचा (Police Head Constable) प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असताना आकस्मिक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, २५ जुलै रोजी दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेत त्यांचे बाळही दगावले आहे.
सांची सुदेश सावंत (३८, रा. हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. गुरुवारी रात्री त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यांना अचानकपणे आकडी (seizure) आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. अधिक उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सांची सावंत यांचे पतीही पोलीस दलातील श्वान पथकात (Dog Squad) पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला आधीच दोन मुली आहेत. सांची तिसऱ्यांदा गरोदर असताना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. परंतु शुक्रवारी सकाळी त्यांना आकडी येऊन त्या बेशुद्ध पडल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना शहरातीलच दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्यावर सांची यांच्या पतीने त्यांना तातडीने दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने त्यांचे बाळही दगावले असून, सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी ४.३० वाजता उत्तरीय तपासणीसाठी (post-mortem) सांची यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान, सांची यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर पोलीस ठाणे, श्वान पथकातील पोलीस कर्मचारी तसेच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. या घटनेने रत्नागिरी पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
#RatnagiriPolice #TragicLoss #PregnantPolicewoman #MaternalMortality















