🌟 कोकणातील याही नेत्याच ठरलं, प्रशांत यादव भाजपात; १९ ऑगस्टला प्रवेश सोहळा 🌟
मंत्री नितेश राणे यांची घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.
नितेश राणे म्हणाले, “प्रशांत यादव हे रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे नेतृत्व आहे. कार्यकर्ता म्हणून नाही, तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले असून, अनेकांना रोजगार दिला आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. असा नेता आमच्या पक्षात आला तर निश्चितच भाजपला फायदा होईल.”
प्रशांत यादव यांचा प्रवेश सोहळा १९ ऑगस्ट रोजी नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी सांगितले की, “पालकमंत्री ना. उदय सामंत हे आमच्या मतदारसंघातील ज्येष्ठ मंत्री आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रशांत यादव यांनी योग्यता पाहून निर्णय घेतला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे तळागाळापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे संघटना अधिक भक्कम होईल.”
या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत यादव फक्त ६,८०० मतांनी पराभूत झाले होते, याची आठवण करून देत नितेश राणे यांनी २०२९ मध्ये भाजप निश्चितच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. यादव यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
हॅशटॅग :
#PrashantYadav #BJP #Ratnagiri #Chiplun #NiteshRane #DevendraFadnavis #PoliticalNews #RatnagiriPolitics
फोटो















