गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करून फार्मर आयडी काढा – जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि. 29 (जिमाका): गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषि व ग्रामविकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्य शासनाने 11 एप्रिल 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पीक विमा, फळपीक विमा, नैसर्गिक आपत्ती भरपाई, पीएम किसान योजना इत्यादी कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाने पीएम किसान योजनेमधील लाभार्थ्यांना ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.
गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच बाहेरगावी असणाऱ्यांनी प्रलंबित नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणीसाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येईल. तसेच सीएससी केंद्रे, कृषि विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
दरम्यान, केंद्र सरकारमार्फत जनसमर्थ केसीसी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये ॲग्रीस्टॅक डेटाचे एकात्मिकरण करण्यात आले असून शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ आणि पेपरलेस पद्धतीने पीककर्ज मंजुरी मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे खालील बाबी आवश्यक आहेत:
आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असावा
अधिसूचित बँकेत खाते असावे
शेतकरी ॲग्रीस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत व मंजूर असावा
सद्यस्थितीत ही सुविधा फक्त जमिनीची वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधून किंवा सीएससी केंद्रांमार्फत जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करावा, असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.















