गुहागर तालुका बळीराज सेना पक्षाच्या वतीने दि.२२, २३ रोजी पडवे जि.प. गटाचा संपर्क दौरा
आबलोली (संदेश कदम)
पक्ष वाढीसाठी तसेच आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवार निश्चित करणे सोबतच जिल्हा परिषद पडवे गटातील पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ ते रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा संपर्क दौरा आयोजित करण्यात आला असून या संपर्क दौ-यात जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम माळी, तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते,तालुका अध्यक्ष अरुण भूवड यांचेसह मान्यवर सहभागी होऊन मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.
या संपर्क दौऱ्यात पायाभूत सुविधा, शेतीच्या समस्या, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दयनीय अवस्था, रोजगाराच्या संधी, शाळा व अंगणवाडींची स्थिती, तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्षात किती लोकांपर्यंत पोहोचतो आहे याचा आढावा घेतला जाईल.
बळीराज सेना पक्षाकडून या दौर्यात नागरिकांच्या तक्रारी आणि सूचना नोंदवून त्यावर पुढील पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. संपर्क दौऱ्यादरम्यान पक्षाच्या धोरणांची माहिती देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणीसाठीही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी पडवे जि.प. गटातील सर्व गावांतील शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गुहागर तालुका बळीराज सेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी माहिती गुहागर तालुका बळीराज सेना पक्षाचे सचिव ॲड. दिनेश कदम यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.















