राज्याला आदर्शवत अभियान : मिशन लोकशाही
पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी श्री. शेखर भिलारे साहेब यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
गुहागर – २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधानाला पूर्णत्व प्राप्त झाले. याच सुवर्णदिनी संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हाती सन्मानाने सुपूर्त केले. याच दिवशी हे संविधान स्वीकारले गेल्याने आजचा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा होत असतो.
आज आपला देश संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.” संपूर्ण जगात सर्वात विशाल, समृद्ध आणि संतुलित असे संविधान आपले भारतीय संविधान आहे.” असे गौरवोद्गार राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी काढले होते. “भारतीय संविधान हा देशाच्या आत्म्याचा आरसा आहे.” असे उदगार पंडित नेहरू यांनीही त्यावेळी काढले होते. असे हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान ज्या महामानवाच्या लेखणीतून साकार झाले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “भारतीय संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर ते सामाजिक व आर्थिक क्रांतीचे साधन आहे.”
या संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र व बंधुत्वाची मानवतावादी मूल्ये बहाल केलेली आहेत. हे प्रत्येक नागरिकाचे भाग्यविधाते असलेले भारतीय संविधान आमच्या सर्वांचा अभिमान आहे. आज संविधान निर्मितीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात संविधान विषयक आदर,निष्ठा व श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी शासनाने “हर घर संविधान” हा उपक्रम साजरा करण्याचे आवाहन केलेले आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पंचायत समिती गुहागरचे नवनियुक्त, कर्तव्यदक्ष व खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले गटविकास अधिकारी श्री. शेखर भिलारे साहेब यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ” मिशन लोकशाही ” या उपक्रमाची योजना केली आहे. या उपक्रमाविषयी शाळा शाळातून आनंददायी वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यात या गौरवशाली अभियानाविषयी समस्त नागरिक प्रशंसा करत आहेत. खरोखरच संपूर्ण महाराष्ट्राने या उपक्रमाचा आदर्श घ्यावा व राज्यभर अंमलबजावणी करावी असे हे मिशन लोकशाही अभियान आज संविधान दिनापासून कार्यान्वित होत आहे.
या मिशन लोकशाही उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून संविधान जनजागृतीसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी इयत्ता चौथी व पाचवी असा एक गट असणार आहे. तर इयत्ता सहावी व सातवी साठी दुसरा गट असणार आहे. दोन्ही गटासाठी होणाऱ्या १०० गुणांच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ५० बहूपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. यातील ३० प्रश्न केवळ भारतीय संविधान याविषयी असणार आहेत. तसेच १० प्रश्न विविध महान नेत्यांच्या जीवनावर आधारित असणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई यांच्या जीवन चरित्रांचा यामध्ये समावेश आहे. तसेच इतर ५ प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर गणित विषयाचे व ५ प्रश्न बुद्धिमत्ता विषयाचे असणार आहेत. ही परीक्षा २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनी केंद्रस्तरावर होणार आहे. या परीक्षेसाठी तालुक्यातील एकूण ३०६० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेतून प्रत्येक केंद्रातून, प्रत्येक इयत्तेतून ३ विद्यार्थी गुणांनुक्रमे निवडले जाणार आहेत. तालुक्यातील २० केंद्रातील चौथी ते सातवीचे मिळून एकूण २४० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. यांची तालुकास्तरावर ५ डिसेंबर रोजी अशाच स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार आहे. यातून गुणानुक्रमे प्रत्येक इयत्तेचे ३ मुलगे व ३ मुली अशा ६ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या निवडलेल्या विद्यार्थ्यांतून पहिल्या गटातील इयत्ता चौथी व पाचवीच्या १२ विद्यार्थ्यांना मुंबई व इयत्ता सहावी सातवीच्या १२ विद्यार्थ्यांना दिल्ली येथे अभ्यास दौऱ्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून नेले जाणार आहे. पहिल्या गटातील विद्यार्थ्यांना मुंबई येथे मंत्रालय, विधान भवन, नॅशनल पार्क, नेहरू सायन्स सेंटर अशा अनेक ठिकाणी सफर घडवली जाणार आहे. तर दुसऱ्या गटातील इयत्ता सहावी, सातवीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक कार्यक्रमाला दिल्ली येथे नेले जाणार असून हा भव्य कार्यक्रम पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच यावेळी राष्ट्रपती भवन, जुनी व नवीन संसद भवन, लाल किल्ला अशी शक्य होतील ती स्थळे दाखवली जाणार आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ आज पहिल्या केंद्रस्तरीय परीक्षेच्या माध्यमातून होत आहे. खरोखर राज्याला दीपस्तंभ ठरेल अशा या उपक्रमाला सन्माननीय खासदार साहेब व आमदार साहेबांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा तालुक्याचे आमदार श्री. भास्करशेठ जाधव साहेब, तसेच जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे मॅडम यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परीक्षित यादव साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजयसिंह जाधव साहेब व श्री सागर पाटील साहेब तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार साहेब यासह अनेक अधिकारी स्वतः भेट देणार आहेत. या उपक्रमाविषयी वेळोवेळी मनोगत व्यक्त करताना गटविकास अधिकारी श्री. शेखर भिलारे साहेब यांनी असे सांगितले आहे की, ” हा उपक्रम मागील वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेवेळी परीक्षाकेंद्रांना भेट देत असताना भेट पथकामध्ये नियुक्त सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.प्रमोद केळसकर साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. रायचंद गळवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अविनाश शेंबेकर साहेब, सर्व केंद्रप्रमुख व गुहागर शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ. नेहा जोगळेकर मॅडम यांच्या विचार मंथनातून उदयास आलेला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक संघटनांनीही पाठबळ दर्शविले आहे. तसेच सर्व शिक्षक बांधवांनी या उपक्रमाची अत्यंत उत्साहाने अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये तर चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पालक व पत्रकार बंधूंनी मोलाची साथ दिली आहे. या परीक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी,, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. या उपक्रमाला असेच पाठबळ राहिले व चांगली प्रसिद्धी मिळाली तर पुढील वर्षी हा उपक्रम निश्चितच शासनाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातर्फे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शाळेत राबविला जाईल असा ठाम विश्वास आहे.”
ही रत्नभूमी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. याच भूमीने तीन भारतरत्न देशाला बहाल केले आहेत. आहेत यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा समावेश आहे. याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे गुरु म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख होतो ते नामदार गोपाळकृष्ण गोखले व रावबहादूर सी.के. बोले या गुहागर तालुक्यात जन्माला आलेली महान रत्ने आहेत. पुज्य साने गुरुजी याच जिल्ह्यात जवळच्या दापोली तालुक्यात जन्माला आलेले आहेत. असा हा समृद्ध वारसा या भूमीचा आहे. या महान विभूतींनी या देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेले आहे. हे येथील बालकांना वेळीच कळले तर निश्चित संस्कारक्षम भावी पिढी यातून घडणार आहे. जगाने गौरवलेल्या या महान रत्नांचे थोडे तरी गुण अंगीकारले तरी आपल्या जीवनाचे सोने होईल ही भावना येथील प्रत्येक बालकाच्या मनावर कोरण्यासाठीच हे अभूतपूर्व अभियान या तालुक्यात राबविण्यात येत आहे. निश्चितच या गौरवशाली ” मिशन लोकशाही ” उपक्रमाच्या माध्यमातून बालपणीच भारतीय राज्यघटने विषयी आदर व श्रद्धा प्रत्येक बालकाच्या मनात निर्माण होईल. याचबरोबर प्रत्येकाला संविधानाची ओळख होईल. संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधानाने आम्हाला काय दिले, आपले संविधान जगात श्रेष्ठ का आहे याची उत्तरे त्यांना स्वयंअध्ययनातून मिळतील. तसेच महान नेत्यांच्या जीवन चरित्राच्या अभ्यासातून अमूल्य असे संस्कार बालमनावर घडतील. खरोखरच भविष्यात या तालुक्यात आदर्शवत व मूल्यसंपन्न नागरीक निर्माण होतील अशी खात्री वाटते. अशा या आदर्श, संस्कारसंपन्न, राष्ट्र निर्माणासाठी पायाभूत ठरणाऱ्या मिशन लोकशाही उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.















