लोककलेवरील आरोप ठरले निराधार; २० जणांची निर्दोष मुक्तता
शिमगोत्सवातील ‘नमन–वग नाट्य’ प्रकरणी सात वर्षांच्या खटल्यानंतर गुहागर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
गुहागर 🙁सुजित सुर्वे)
गुहागर तालुक्यातील खाडी पट्ट्यात वसलेल्या भातगाव येथे दरवर्षी शिमगोत्सवानिमित्त स्थानिक ग्रामस्थांकडून नमन व वग नाट्य सादर करण्याची अनेक दशकांची लोकपरंपरा आहे. या परंपरेअंतर्गत सन २०१८ मध्ये सादर झालेल्या एका नमनातील संवादांवर आक्षेप घेत एका कुटुंबाने बदनामी झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून तब्बल २० लोककलाकारांविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी गुहागर न्यायालयात सात वर्षे चाललेला फौजदारी खटला अखेर निकालात निघाला असून, न्यायालयाने सर्व २० आरोपी ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणातील सर्व आरोपी हे हौशी लोककलाकार असून उदरनिर्वाहासाठी मुंबई–पुणे येथे नोकरी व व्यवसाय करतात. केवळ सणासुदीच्या काळात गावी येऊन लोककला सादर करणाऱ्या या ग्रामस्थांना, खटल्यामुळे गेल्या सात वर्षांत मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यांच्या कामधंद्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रत्येक तारखेला प्रत्यक्ष हजर राहण्याची सक्ती टाळण्याबाबत न्यायालयात योग्य भूमिका मांडण्यात आली.
खटल्याच्या अंतिम युक्तिवादात कोकणातील लोकपरंपरा, लोककलेचे सांस्कृतिक महत्त्व, कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर भर देण्यात आला. ग्रामीण भागातील तरुण मंडळी लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
तसेच, बदनामीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तपास करण्याचा अधिकार नसतो, तसेच या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेले अदखलपात्र गुन्ह्याचे दोषारोपपत्र हे मुळातच बेकायदेशीर असल्याचा ठोस कायदेशीर युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला.
आज या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर करताना मा. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता जाहीर केली. निकालानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधान आणि हास्य हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक ठरला.
या संपूर्ण खटल्यात
ॲड. मानसी सोमण, ॲड. रोशनी पवार, ॲड. अलंकार विखारे आणि ॲड. सुप्रिया वाघधरे
यांचे मोलाचे सहकार्य लाभले.















