आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी व प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी यांचे वार्षिक वनभोजन कर्दे येथील तारमळा शेतात उत्साहात संपन्न
गुहागर ~
कोकणातील निसर्गसंपन्न गावांपैकी एक असलेल्या कर्दे येथील तारमळा शेतात आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी व प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी यांचे वार्षिक वनभोजन अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडले.

दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजनबद्ध पद्धतीने हा स्नेहभोजन व वनभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथील इयत्ता १ ली ते ७ वी तसेच बालवाडी, आणि प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी येथील इयत्ता १ ली ते ५ वी व बालवाडीतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यंदा सुरुवातीला ऐतिहासिक गड-किल्ल्यांना भेट देण्याचा विचार होता. मात्र अलीकडील काळात विविध शाळांच्या सहलीदरम्यान झालेल्या दुर्घटनांचा विचार करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत सहल रद्द करून वनभोजनाचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून स्वागतार्ह ठरला.
वनभोजनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो, लंगडी तसेच क्रिकेट खेळत विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे या खेळांमध्ये ग्रामस्थ महिला, माता-पालक व माजी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोबाईलच्या युगात हरवत चाललेल्या पारंपरिक खेळांचे महत्त्व त्यांनी प्रत्यक्ष खेळून नव्या पिढीसमोर अधोरेखित केले.
खेळात जिंकण्यापेक्षा एकी, मैत्री आणि एकत्र येण्याचे बळ महत्त्वाचे असते, हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. महिलांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून आला आणि संपूर्ण परिसर हास्य, आनंद व खेळकर वातावरणाने भारून गेला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन
आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीचे मुख्याध्यापक अंकुर मोहिते सर, संदीप भोये सर, साईनाथ पुजारा सर,
तसेच प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडीचे मुख्याध्यापक प्रमोद साळवी सर, ज्ञानेश्वर कोकाटे सर,
अंगणवाडी सेविका संगीता सुर्वे मॅडम व सौ. दर्शना जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
निसर्गाच्या सान्निध्यात तयार करण्यात आलेल्या चविष्ट भोजनाचा सर्वांनी मनमुराद आस्वाद घेतला. माता-पालक, ग्रामस्थ, महिला मंडळ व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे हा वनभोजन कार्यक्रम अत्यंत यशस्वी व अविस्मरणीय ठरला.
बातमी सौजन्य ~सचिन कुळे
















