उपनगराध्यक्षपदी रूपाली दांडेकर यांची नियुक्ती निश्चित
चिपळूण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा उद्या
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा उद्या सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण सभेत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे.
चिपळूण नगर परिषदेत भाजप–शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले असून, युतीअंतर्गत उपनगराध्यक्षपद भाजपकडे देण्यात आले आहे. त्यानुसार भाजपकडून नगरसेविका रूपाली दांडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, उद्याच्या सभेत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
रूपाली दांडेकर या पेठमप प्रभागातून भाजपच्या वतीने निवडून आल्या आहेत. त्या डि.बी.जे. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्याचा वारसा त्यांना घरातूनच लाभला असून, त्यांचे सासरे स्व. आण्णा दांडेकर हे चिपळूण शहरातील सुप्रसिद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.
भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी उपनगराध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेकडे शहराचे लक्ष लागले असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर नगर परिषदेच्या कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.















