🟣 सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट
महानगरपालिका निवडणुकीनंतर गटनेतेपद पुन्हा किशोरी पेडणेकर यांच्याकडे; ज्येष्ठ नगरसेवक डावलल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता
मुंबई :
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर ठाकरे गटात अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षातील सर्व महत्त्वाची पदे वरळी विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनाच का दिली जात आहेत, असा थेट सवाल आता नाराज शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले असून भाजपनंतर ठाकरे गट हा दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, नगरसेवकांची गट नोंदणी करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच पुन्हा एकदा गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद बहाल केल्यावरून पक्षांतर्गत जोरदार कुजबूज सुरू झाली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक निवडून आलेले असताना त्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे कोरोना काळानंतर किशोरी पेडणेकर यांच्यावर विविध आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना एवढी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने अनेक पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.
तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून किशोरी पेडणेकर यांची ओळख असली, तरी मध्यंतरी त्यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एबी फॉर्म मिळण्यासाठी त्यांना ताटकळत राहावे लागले होते. प्रभागात नाराजी असतानाही पक्षाने अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी दिली आणि आता निवडणुकीनंतर पुन्हा गटनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांसारखी अनेक मातब्बर मंडळी निवडून आली आहेत. मात्र, या सगळ्यांना डावलून पेडणेकर यांनाच संधी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होत आहे.
विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ माजी नगरसेवकांची मोठी फौज आहे. त्यामुळे ‘शिवसेनेतील सगळी महत्त्वाची पदे वरळीपुरतीच मर्यादित का?’ असा सवाल आता उघडपणे केला जात आहे.
ही वाढती नाराजी उद्धव ठाकरे कशा पद्धतीने हाताळतात आणि पक्षातील असंतोष कसा शांत करतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














