स्मृतिदिन – नाट्य कलावंत चंदू पारखी यांना विनम्र अभिवादन.
एखाद्याकडे बघून भीती सुद्धा वाटावी, चीड सुद्धा यावी, आणि वेळ पडलीच तर तो चेहरा तितकाच मिश्किल सुद्धा वाटावा अशा चेहऱ्यांमध्ये निळू फुले, सदाशिव अमरापूरकर नंतर कोणाचं नाव घ्यावं तर त्यात मी ‘चंदू पारखी’ यांचे घेईल.
आजच्या पिढीला हा अभिनेता कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर नाही देता येणार. फार तर फार आजच्या पिढीतील कोणी जर लॉक-डाऊन मध्ये ‘ब्योमकेश बक्षी’ ही मालिका दूरदर्शनवर पुन्हा पहिली असेल तर त्यांना एकवेळ हा चेहरा आठवणीत असण्याची शक्यता आहे.
क्रूर नियतीने जर वयाच्या पन्नाशीलाच यांना आपल्यातून नेले नसते तर मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी काय हिंदी सिनेमाला सुद्धा अगदी निळू फुलेंच्या तोडीस तोड अभिनेता मिळाला असता. दस्तुरखुद्द निळू भाऊंचेच हे वाक्य आहे की ‘माझी जागा केवळ चंदू पारखीच घेऊ शकतो.’
अभिनयाच्या वेडापायी मूळचे इंदौरवासी असलेल्या चंदू यांनी खरोखरच जीवाची मुंबई केली. इतकी की दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याने खाण्यासाठी खिशात लसणाच्या पाकळ्या ठेऊन हा अवलिया दिवस काढायचा. का तर लसणाने भूक लागत नाही म्हणून. किती ही क्रूर चेष्टा नियतीची. एके दिवशी अभिनेता विनय आपटेंना हा सर्व प्रकार कळला आणि मग त्यांनी चंदू यांची मदत केली. पण तोवर त्यांच्या या सवयीने जो घात करायचा होता तो केलाच आणि आजारपण मागे लागले.
अनेक नाटकं केली, मराठी-हिंदी सिनेमे केले, मालिका केल्या पण शेवटपर्यंत स्ट्रगल सुरूच होता. कमालीचा मुद्राभिनय आणि हसण्या-बोलण्याची काहीशी मिश्किल अशी लकब यामुळे चंदू रसिकांना खूप आवडायचे.
संघर्ष कोणाच्या नशिबी नसतो? राकेश बेदी सारख्या अभिनेत्याला धुरंधर रुपी ओळख मिळायला काय कमी संघर्ष करावा लागला. चंदू पारखींच्या प्रतिभेला एक अखेरची ओळख मिळावी इतकी तरी मुदत त्यांना नशिबाने दिली असती तर नक्कीच असाच एखादा भन्नाट जमील जमाली चंदू यांनी झक्कास रंगविला असता, ज्याच्याकडे बघून भीती, चीड आणि हसू सुद्धा यावे.
आजच्या स्मृतिदिनी चंदू पारखी यांना विनम्र अभिवादन.
– अजिंक्य उजळंबकर
Credit by -Facebook post
#chanduparkhi
#marathicinema
#Doordarshan
#natak
#rangbhumi















