महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६; ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान
नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे.
विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांमार्फत) निवडून द्यायच्या या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र विधानपरिषेदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि राजेश राठोड या नेत्यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी आता निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे.
जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार,
या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना २३ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल. इच्छुकांना ३० एप्रिलपर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर २ मे रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून ४ मे पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
मतदानाची प्रक्रिया १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडेल. विशेष म्हणजे, मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि रात्रीपर्यंत निकाल जाहीर केले जातील.
————====————
















