कबड्डी स्पर्धेत केळशीचा ‘गजानन संघर्ष’ प्रथम
दापोली : साहिल स्पोर्ट्स, चंद्रनगर आयोजित भव्य तालुकास्तरीय खुल्या गटातील कबड्डी स्पर्धा चंद्रनगर मळे येथील क्रीडा नगरीत क्रीडा रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत आणि उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण १६ संघ सामील झाले होते. या स्पर्धेचा उपांत्य तसेच अंतिम फेरीचा सामना गुरुवारी ९ जानेवारी रोजी रात्रौ उशिरा संपन्न झाला.
कडाक्याची थंडी जाणवत असतानाही कबड्डी सामने पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठीच गर्दी केली होती. या स्पर्धेत केळशी येथील गजानन संघर्ष कबड्डी संघाचे अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी जालगावच्या भैरवनाथ कबड्डी संघाला पराभूत करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे जालगावच्या भैरवनाथ संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक हा श्री सीमा माता सालदुरे तर चतुर्थ क्रमांक कर्देच्या श्रीराम कबड्डी संघाला जाहीर करण्यात आला. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा मान तेजस रहाटे तसेच उत्कृष्ट पक्कड आविष्कार जाधव या जालगावच्या भैरवनाथ कबड्डी संघातील खेळाडूंना तर उत्कृष्ट चढाईचे बक्षीस केळशी येथील गजानन संघर्षाच्या सिध्देश गौरत या खेळाडूला देण्यात आले.















