प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ न मिळाल्यास रिपाई (आठवले) करणार आंदोलन- विजय खैरे
मंडणगड तालुक्यातील लाभार्थी लाभापासून २ वर्ष वंचित
आबलोली (संदेश कदम)
भारत सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री कडून जे ग्रामीण भागातील शेतकरी असतील त्यांच्या सन्मानार्थ हा निधी दिला जातो. तसेच तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी मधील विविध गावांमधील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी यांची सातबारा महसुली तांत्रिक समस्येमुळे गेली दोन वर्ष त्यांना लाभ मिळत नाही आहे. तसेच त्याकरिता लाभार्थ्यांनी वेळोवेळी तहसील कार्यालय असो किंवा ता.कृषी अधिकारी कार्यालय असो यांना संपर्क केला असता अजूनही त्यावर निवारण झालेले नाही. त्यामुळे सदर समस्या तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षाचे वतीने जिल्हा संघटक विजय खैरे व तालुका सचिव रामदास खैरे यांनी निदर्शनात आणली आहे. सदर योजनेच्या लाभार्थ्यांना २६ जानेवारी २०२५ पर्यंत जर लाभ मिळाला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड यांच्याकडून उपोषण अथवा आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनाद्वारे म्हटले आहे. तसेच कृषी अधिकारी मंडणगड यांनाही निवेदन दिलेले आहे. सदर निवेदनावर विजय खैरे रामदास खेरे यांच्या सह्या आहेत.















