आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..
देवरुख– शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ज्ञानदा गुरुकुल संस्था, पुणे यांच्यामार्फत महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मान्यवरांच्या परिचयानंतर सर्वांचे कागदी पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर प्रा. सीमा शेट्ये यांनी कार्यशाळेचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केला.
प्रशिक्षण कार्यक्रमात ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक मिलिंद डांगे यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडवताना योग्य दिशा व मार्गदर्शनाची असलेली आवश्यकता स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी गुरुकुल पद्धतीचे महत्त्व, कौशल्याधारित प्लंबिंग प्रशिक्षण, बांधकाम क्षेत्रातील पायपिंगचे महत्त्व, आधुनिक काळातील प्लंबिंग क्षेत्रातील संधी. तसेच लौकिक शिक्षणाबरोबर कुशल कामगार घडवणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. संस्थेचे मोबिलायझेशन ऑफिसर सोमनाथ कुलकर्णी यांनी आपल्या संस्थेतून प्रशिक्षित झालेल्या व स्वावलंबी, सन्मानाचे आयुष्य जगत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली. पीपीटीच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथाही प्रदर्शित केली.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्यामार्फत बी.सी.ए. कॉलेजच्या प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेतील विविध कोर्सेसची माहिती दिली. त्याचबरोबर या संस्थेच्या विविध शाखा, संस्थेचे उद्दिष्ट याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या समीना मुलानी, प्रा. केतन पाथरे आणि प्रा. प्रतिभा लोंढे यांनीही करिअर विषयक मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेच्या उपाध्यक्षा नेहा जोशी यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवनासाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने प्लंबिंगचे प्रशिक्षण सुरू केले जाणार असून विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था उपाध्यक्षा सौ. जोशी यांनी याप्रसंगी केले. या प्रशिक्षणाचा लाभ इ. ११वी व १२वीच्या बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला. या कार्यशाळेबाबत बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणात हस्तकला, कारागिरी, बांधकाम क्षेत्रातील विविध कौशल्य, तसेच डिजिटल कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासंदर्भात असलेल्या तरतुदी स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, राहुल फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आयोजकांचे कौतुक केले

Author: Prachi Sutar
Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.