मनोरंजनसुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन, ‘वाह उस्ताद वाह’ म्हणत तबल्यावर लिलया पडणारी थाप शांत!
प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
झाकीर हुसैन यांचं निधन (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. झाकीर हुसैन यांना सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं. मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं. झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत कशी असते अगदी तसंच होतं. वडील अल्लाह राखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबलावादनाचे धडे गिरवले होते. मात्र याच अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झालं आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोण होते झाकीर हुसैन?
झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र होते. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली. तसंच वयाच्या १२ व्या वर्षापासून झाकीर हुसैन देशभरात त्यांनी तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती.