देवरुखचा अर्णव कुलकर्णी राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत विजेता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देवरुखचा अर्णव कुलकर्णी राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत विजेता

देवरूख -पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी (PICT), पुणे यांनी आयोजित केलेल्या “राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा – इलेव्हेट २५” मधील कॅरम स्पर्धेत देवरुखच्या अर्णव विनायक कुलकर्णीने एकेरी गटात विजेतेपद मिळवत देवरुख नगरीच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र, अर्णवने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धकांवर मात केली आणि विजेतेपद पटकावले.

विजेतेपदाबद्दल विशेष गौरव

अर्णवच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयोजकांकडून त्याचा सन्मान करण्यात आला. विजेतेपदाच्या चषकासह त्याला प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे अर्णवच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे.

अर्णवचा शैक्षणिक आणि क्रीडा प्रवास

अर्णव हा मूळचा देवरुखच्या वरची आळी येथील रहिवासी आहे. त्याचे वडील विनायक श्रीकांत कुलकर्णी ॲडलर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, साडवली येथे मार्केटिंग कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत, तर आई संज्ञा कुलकर्णी निष्णात ड्रेस डिझायनर आहेत.

त्याने आपले प्राथमिक शिक्षण आदर्श छत्रपती शिवाजी विद्यामंदिर पू. प्रा. शाळा नं. ४ येथे पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख येथे घेतले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तो पुण्यातील सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाला. सध्या तो पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (VIIT) येथे बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) द्वितीय वर्ष शिकत आहे.

कॅरम खेळातील यशाचा वारसा

अर्णवला कॅरमच्या खेळाची गोडी वडील विनायक कुलकर्णी यांच्याकडूनच लागली. त्यानंतर, रवींद्र कुलकर्णी, दामोदर घाणेकर, निनाद देसाई, योगेश साठे, पंकज खरात, योगेश आणि विजय कोंडविलकर यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले. सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

देवरुख नगरीत आनंदाचे वातावरण 

अर्णवच्या या यशामुळे देवरुख परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध संघटनांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अर्णव भविष्यात आणखी मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]