संगमेश्वर-पाटण घाटमार्ग डीपीआर सर्व्हेक्षणाची पाहणी; लवकरच अहवाल सादर करण्याच्या सूचना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संगमेश्वर-पाटण घाटमार्ग डीपीआर सर्व्हेक्षणाची पाहणी; लवकरच अहवाल सादर करण्याच्या सूचना

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या संगमेश्वर-पाटण घाटमार्गाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सर्वेक्षणाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी केली. २८ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर तालुक्यातील नेरदवाडी येथे त्यांनी भेट देऊन सर्वेक्षण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या दौऱ्यात समन्वयक संतोष येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जाधव, शाखा अभियंता अक्षय बोरसे, लक्ष्मीकांत खातू, गुरुप्रसाद भिंगार्डे, ओंकार लोध, निल खातू, संतोष खातू, भागोजी शेळके, माजी सरपंच कोंडीबा शेळके, कोंडीबा सिदू शेळके, पांडुरंग येडगे, प्रकाश शेलार, कृष्णा कोळापटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

४६ किमी रस्त्यासाठी सर्वेक्षण प्रगतीपथावर

संगमेश्वर ते पाटण या ४६.६०० कि.मी. लांबीच्या घाटमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेयर्स अँड इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स लि. (Monarch Surveyors And Engineering Consultants Ltd) या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीचे तेजस माने यांनी घाटमार्गाच्या रस्त्याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी रस्त्याच्या वळणबांधणी आणि पाटण तालुक्यातील लांबीसंदर्भात सूचना दिल्या. सर्वेक्षण अचूकपणे पूर्ण करून अहवाल विहित मुदतीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या प्रकल्पांतर्गत २६.६०० कि.मी. रस्ता आधीच तयार झाला असून उर्वरित २० कि.मी. रस्त्याचे काम करावे लागणार आहे. यातील ५.५०० कि.मी. रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात तर १४.६०० कि.मी. रस्ता सातारा जिल्ह्यात आहे. या रस्त्याच्या त्वरित मंजुरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे समन्वयक संतोष येडगे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला महत्त्वाचा घाटमार्ग

संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी २०१८ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. यासाठी आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

हा मार्ग संगमेश्वरपासून सुरू होऊन हातखंबा, बावनदी, आंबेड, करंबेळे, धामणी, कसबा, कारभाटले, मासरंग, तांबेडी, माखजन, असुर्डे, नांदगाव, पाथे अशा सह्याद्रीच्या दुर्गम भागातील अनेक गावांना जोडणारा आहे. या घाटमार्गामुळे पुणे-साताऱ्याकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुकर होणार असून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.

संगमेश्वर-पाटण घाटमार्गाच्या कामाचे भूमिपूजन १९९९ मध्ये युती सरकारच्या काळात झाले होते. सध्या पुन्हा युती सरकार सत्तेत असून या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी जनतेतून मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही जिल्ह्यांतील ४ लाखांहून अधिक नागरिक या मार्गाच्या त्वरित पूर्णतेसाठी आग्रही आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]