श्री महामाई सोनसाखळी क्रिकेट संघ तवसाळ – कुणबी युवा चषक पर्व ८ चा विजेता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


श्री महामाई सोनसाखळी क्रिकेट संघ तवसाळ – कुणबी युवा चषक पर्व ८ चा विजेता

गुहागर – तवसाळ | प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील सर्वांत मानाचा समजला जाणारा कुणबी युवा चषक क्रिकेट स्पर्धेचा पर्व ८ मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून, या स्पर्धेत तवसाळ गावचा श्री महामाई सोनसाखळी क्रिकेट संघ अंतिम विजेता ठरला आहे.

सन २०१८ मध्ये मुंबई–विरार येथे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या पुढाकाराने आणि गुहागर तालुक्यातील कुणबी युवा क्रीडा समिती स्थापन झाल्यानंतर सलग आठव्या वर्षी ही भव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. गुहागर तालुक्यातील ही सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते.

यावर्षीच्या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू हे कुणबी समाजाचेच होते. सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. सुनील ठोंबरे व त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेची सुरुवात तवसाळ संघाने ओपनिंग सामन्याने केली आणि अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत झालेल्या सर्व ८ हंगामांत तवसाळ गावचा संघ विजेता ठरलेला आहे, ही अभिमानास्पद कामगिरी आहे.

या विजयाचा आनंद साजरा करताना, विजयी चषक घेऊन तवसाळ गाव पंचक्रोशीतील श्री महामाई सोनसाखळी देवीच्या मंदिरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडीतील ग्रामस्थ, महिला, मुले तसेच मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुकीत देवीच्या चरणी चषक अर्पण करून “जय महामाई सोनसाखळी” चा जल्लोष करण्यात आला.

याआधी सन २०१९ मध्ये कुणबी युवा चषक पर्व २ चा चषक जुन्या मंदिरात अर्पण करण्यात आला होता. सन २०२६ मध्ये गावदेवीच्या जिर्णोद्धारानंतर नवीन मंदिरात हा मानाचा चषक अर्पण करण्याचा योग आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना.

या प्रसंगी क्रिकेटप्रेमी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तवसाळ गावाचे नाव उंचावल्याबद्दल संपूर्ण तवसाळ गटातून संघाचे अभिनंदन करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]