भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय

भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट १ सामन्यात भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत आपली विजयी घोडदौड पुन्हा सुरू केली. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडत २० षटकांत ४ बाद तब्बल २५६ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत ६ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

भारताच्या डावाची सुरुवात आक्रमक झाली. संजू सॅमसनने १५ चेंडूत २४, अभिषेक शर्माने ३० चेंडूत ५५ धावा करत झटपट सुरुवात करून दिली. त्यानंतर इशान किशनने २४ चेंडूत ३८, सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत ३३ धावा करत आक्रमण कायम ठेवले. मात्र सामन्याचा खरा रंग चढला तो हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या जोडीने. हार्दिक पांड्याने अवघ्या २३ चेंडूत नाबाद ५० धावांची तुफानी खेळी साकारली, तर तिलक वर्माने १६ चेंडूत नाबाद ४४ धावा ठोकल्या. या दोघांनी अखेरच्या षटकांत धावांचा अक्षरशः वर्षाव करत भारताला २५६ धावांपर्यंत नेऊन ठेवले.

या डावात भारताचा रनरेट तब्बल १२.८० इतका राहिला. टी–२० विश्वचषक इतिहासात भारताची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या ठरली, तर सुपर–८ फेरीतील सर्वाधिक संघधावसंख्येचा नवा विक्रम प्रस्थापित झाला.

२५७ धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात संथ झाली. मात्र ब्रायन बेनेटने एकाकी झुंज देत ५९ चेंडूत नाबाद ९७ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याने ८ चौकार आणि ६ षटकार ठोकत प्रेक्षकांची मने जिंकली. सिकंदर रझाने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने झिम्बाब्वेचा डाव १८४ धावांतच आटोपला.

भारतीय गोलंदाजीत अर्शदीप सिंगने अचूक यॉर्कर्सचा मारा करत ४ षटकांत २४ धावांत ३ बळी घेत महत्त्वाची कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. हार्दिक पांड्याने किफायतशीर गोलंदाजी करत ३ षटकांत केवळ २१ धावा दिल्या.

या सामन्यात नोंदले गेलेले विक्रम. भारताची २५६ धावा – सुपर–८ फेरीतील आजवरची सर्वाधिक संघधावसंख्या. टी–२० विश्वचषकात भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या. हार्दिक पांड्याची २३ चेंडूत ५० धावा – टी–२० विश्वचषकात भारताकडून नोंदवलेले तिसऱ्या क्रमांकाचे जलद अर्धशतक. तिलक वर्माचा स्ट्राईक रेट २७५.०० – किमान ४० धावांच्या खेळीत विश्वचषकातील सर्वोच्चांपैकी एक. शिवम दुबेने २ षटकांत दिलेल्या ४६ धावा – टी–२० विश्वचषक इतिहासातील फक्त दोन षटकांत सर्वाधिक धावा देण्याचा नवा विक्रम. ब्रायन बेनेट नाबाद ९७ धावा – झिम्बाब्वेकडून टी–२० विश्वचषकातील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी.

या विजयासह भारताने सुपर–८ गटातील आपली स्थिती मजबूत करत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. तर सलग पराभवांमुळे झिम्बाब्वेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता भारताचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध ‘व्हर्च्युअल उपांत्यपूर्व’ लढतीत होणार असून, हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

एकूणच, भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळीने आणि विक्रमांच्या बरसातीने रंगलेला हा सामना टी–२० विश्वचषक २०२६ मधील सर्वांत संस्मरणीय सामन्यांपैकी एक ठरला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें