मुंढर-कातकरी ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच अमिषा गमरे यांना ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्कार; ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याचा गौरव
नालंदा ऑर्गनायझेशनचा राज्यस्तरीय सन्मान; ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांचाही ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी : मंगेश जाधव | गुहागर
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत मुंढर-कातकरीच्या आदर्श सरपंच अमिषा अजित गमरे यांना ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे येथील नालंदा ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थेतर्फे प्रतिष्ठेच्या ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचे सर्वेक्षण करून आदर्श कार्य करणाऱ्या सरपंचांची निवड करण्यात आली. त्यामध्ये अमिषा गमरे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.
अमिषा गमरे या ग्रामपंचायतीच्या कामकाजात नियमितपणे सहभाग घेत असून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निधीतून विविध विकासकामे राबविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या निस्वार्थी व लोकाभिमुख कार्याची ही पोचपावती म्हणून त्यांना ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमात मुंढर-कातकरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश गोरे यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या दुहेरी सन्मानामुळे मुंढर-कातकरी ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव झाला असून, अमिषा गमरे आणि सुरेश गोरे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










