महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिलांच्या कला, सृजनशीलता आणि विविध कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या प्रतिभेला सजगतेने ओळख देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित महिला कला महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, राजश्री कुलकर्णी, नृत्यांगना सोनिया परचुरे, पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर तसेच विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात येथे सुमारे एक हजाराहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हे प्रांगण कलाकारांसाठी कला आविष्काराचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरले आहे. अनेक कलाकारांना येथे आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री ॲड. शेलार यांनी नमूद केले की, महिला दिन केवळ शुभेच्छांचा औपचारिक दिवस नाही. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे. कुटुंब, समाज आणि परिसरात महिलांची प्रतिभा ओळखून त्यांना पुढे येण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महिलांचे हक्क, समानता आणि सबलीकरण या आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ च्या संकल्पनेचा उल्लेख करताना मंत्री ॲड. शेलार यांनी समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज व्यक्त केली.
महिलांच्या तक्रारींची संख्या वाढत असताना त्यांच्या समस्यांवर केवळ कायदेशीर मार्ग पुरेसा ठरत नाही. महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाची भावना निर्माण होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमांमधून महिलांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा समाजासमोर मांडल्या जात आहेत. या माध्यमातून महिलांमध्ये सजगता आणि आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास नंदिनी आवडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी प्रास्ताविक करताना महिला कला महोत्सव २०२६ ची रूपरेषा मांडली. ८ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें