उन्हाळ्याचा कडाका वाढताच मातीच्या माठांना बाजारात मोठी मागणी; ‘गरीबांचा फ्रीज’ ठरतोय आरोग्यदायी पर्याय

उन्हाळ्याचा कडाका वाढताच मातीच्या माठांना बाजारात मोठी मागणी; ‘गरीबांचा फ्रीज’ ठरतोय आरोग्यदायी पर्याय

फ्रिजच्या थंड पाण्यापेक्षा माठातील नैसर्गिक थंड पाण्याला नागरिकांची पसंती; कुंभार बांधवांना मिळतोय रोजगाराचा आधार

तळवली | प्रतिनिधी (मंगेश जाधव)

होळीनंतर उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढू लागली असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांची पाण्यासाठी अक्षरशः लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत फ्रिजच्या अतिथंड पाण्यापेक्षा आरोग्यासाठी हितकारक असलेल्या मातीच्या माठातील पाण्याला नागरिकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत ‘गरीबांचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची विक्री सध्या जोमाने सुरू झाली आहे.

 

फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा तुलनेने सौम्य होत्या; मात्र मार्च सुरू होताच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे थंड पेयांपेक्षा नैसर्गिकरित्या पाणी थंड ठेवणाऱ्या माठांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील श्रीमंत वर्गालाही मातीच्या सुगंधाने युक्त असलेल्या या थंडगार पाण्याचे आकर्षण कायम आहे.

 

फ्रिजमधील अतिथंड पाणी अनेकदा घसा दुखणे किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. याउलट माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होत असल्याने ते अधिक आरोग्यदायी मानले जाते. शिवाय मातीचा मृदगंध पाण्याची चवही वाढवतो. आयुर्वेदानुसारही माठातील पाणी शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

 

उन्हाळ्याची चाहूल लागताच कुंभार बांधवांची लगबग वाढली आहे. हॉटेल, सार्वजनिक पाणपोई तसेच घराघरांत माठांचा वापर वाढत असल्याने माठ निर्मितीला वेग आला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वाढणाऱ्या या मागणीमुळे कुंभार समाजाला मोठा आर्थिक आधार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

यंदा उन्हाळा तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक तृप्तीदायक व आरोग्यदायी असल्याचे सांगत दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन माठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. विजेचा वापर न करता पाणी थंड ठेवण्याची क्षमता आणि मातीचा नैसर्गिक सुगंध यामुळे माठाचे महत्त्व आजही टिकून आहे.

दरम्यान, सामाजिक संस्थांकडूनही उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी माठांच्या पाणपोई उभारण्यावर भर दिला जात आहे.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें