गुहागर पांचाळ सुतार समाज मंडळाचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहात,
६० गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव; समाजभूषण दीपक चिवेलकर यांचा विशेष सन्मान
गुहागर : गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ (रजि.), गुहागर या संस्थेचा ३३ वा वर्धापन दिन आणि ३४ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त भव्य गुणगौरव सोहळा नुकताच शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूलच्या ‘छत्रपती सभागृहात’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला समाजबांधव, माता-भगिनी आणि युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती महेशजी नाटेकर, समाजभूषण दीपकजी चिवेलकर, पांचाळ सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष गंगाराम धामणस्कर आणि जिल्हा कोषाध्यक्ष विनायक काणेकर गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विश्वकर्मा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. जिल्हाध्यक्ष संतोष धामणस्कर यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या ३३ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.
समाजभूषण दीपक चिवेलकर यांचा मानपत्र देऊन गौरव
समाजाच्या प्रगतीसाठी दीर्घकाळ योगदान देणारे समाजभूषण दीपकजी चिवेलकर यांचा संपूर्ण समाजाच्या वतीने मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल उपस्थित समाजबांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
६० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या गुणगौरव कार्यक्रमात समाजातील एकूण ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नवोदित डॉक्टरांचा यामध्ये समावेश होता.
याशिवाय नवोदय परीक्षा, प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कलाकार मानधन योजनेबाबत मार्गदर्शन
समाजातील ज्येष्ठ कलाकार व गुणवंतांसाठी असलेल्या कलाकार मानधन योजनेबाबत केंद्रीय प्रमुख (गुहागर) मनोज पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत कसा पोहोचवावा आणि कलाकारांनी मानधन योजनेचा लाभ कसा घ्यावा, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास शार्दुल सर आणि वासुदेव पांचाळ यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचा समारोप अंकुश पिलवलकर यांनी केला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष सुमित नांदलस्कर, उपाध्यक्ष किशोर नांदलस्कर, दिलीप नाटूस्कर, सचिव नितेश पांचाळ, सहसचिव पुष्कर नाटूस्कर, खजिनदार अरविंद पिंपळकर, अविनाश धोंडू दहिवलकर, महिला अध्यक्षा प्रितमताई नाटूस्कर तसेच सल्लागार मधुकर मेस्त्री, नामदेव नर्बेकर, सुरेश नांदलस्कर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.










