*हेदवी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपूर्ण स्थितीत व निष्कृष्ट दर्जाचे – ग्रामस्थांच्या तक्रारी
आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील मौजे हेदवी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – 1 या दवाखान्याच्या इमारतीचे काम अपूर्ण स्थितीत असून निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला असून यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत तरी या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत ग्रामपंचायत हेदेवी कार्यक्षेत्रामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना मौजे येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -1 एक या दवाखान्याचे अपूर्ण स्थितीत निकृष्ट दर्जाचे झाले असून हेदेवी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक आवश्यक गरजा पूर्ण होत नाहीत तसेच पशुधनासाठी लागणारे औषधे मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या शासन शेती आणि पशुधन याकडे विशेष लक्ष देत असून नवीन नवीन योजना राबवत आहे मात्र हेदवी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना असून देखील शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून बांधकाम खात्याच्या कार्यपद्धतीवर शंकेची पाल चुकचुकत आहे. याबाबत बांधकाम खात्याने त्वरित लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असून निर्मल ग्रामपंचायत हेदेवी यांच्या वतीने मे. उपअभियंता बांधकाम उपविभाग गुहागर यांना लेखी कळविण्यात आले आहे.













