लघु उद्योगांसाठी आरक्षित जागेत सर्कसला परवानगी? – नगरपरिषदेच्या निर्णयावर सवाल
मंगेश जाधव (तळवली)
चिपळूण,- बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी चिपळूण नगरपरिषदेने बहादुरशेख नाका (सावरकर मैदान) येथे लघु उद्योगांसाठी जागा आरक्षित केली होती. मात्र, गेली अनेक वर्षे हा प्रकल्प अंमलबजावणीअभावी रखडला आहे. विशेष म्हणजे, या जागेवर आता लघु उद्योगांऐवजी बाहेरून आलेल्या एका सर्कस कंपनीला भाडेतत्त्वावर जागा देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व माजी सभापती शौकत मुकादम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “लघु उद्योजकांसाठी आरक्षित असलेल्या जागेचा योग्य वापर होण्याऐवजी सर्कसला भाड्याने देण्यात येत आहे. त्यामुळे जागेचे नुकसान होणार असून, बेरोजगार तरुणांवर अन्याय होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
एक वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला या जागेच्या वापराबाबत योग्य प्रक्रिया करून लघु उद्योगांना भाडेतत्त्वावर देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. उलट, सध्या सुरू असलेल्या सर्कशीतून जागेचे खोदकाम आणि नासधूस होत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे.
शौकत मुकादम यांनी नगरपरिषदेने तातडीने लघु उद्योगांसाठीची प्रक्रिया पूर्ण करून या जागेचा उद्देशानुरूप उपयोग करावा, अशी मागणी केली आहे. “शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये कोकणातील तरुणांवर अन्याय होत आहे. त्यातच व्यावसायिक संधीही हिरावल्या जात असतील, तर बेरोजगारांना जायचे कुठे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
नगरपरिषद या वादग्रस्त निर्णयाबाबत स्पष्टीकरण देते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.