हापूसच्या नावाखाली ‘कर नाटकी’ नको!
कर्नाटकी आंब्याच्या भेसळीवर कृषि अधिकाऱ्यांचा वॉच; दर्जा राखण्याचे आवाहन
तळवली (मंगेश जाधव) – रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबा ही कोकणाची ओळख असून जागतिक बाजारपेठेत त्याला विशेष मागणी असते. मात्र यावर्षी हवामानातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन कमी झाले असून, या संधीचा गैरफायदा घेत काही व्यापारी कर्नाटकी आंबा ‘हापूस’ म्हणून विक्री करत असल्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत.
गतवर्षी स्थानिक आंबा व्यापाऱ्यांनी अशा बनावट विक्रेत्यांना हुसकावून लावले होते. यावर्षी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तालुका व पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांना निगराणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हापूस आंब्याच्या नावाला धक्का लागू नये यासाठी कर्नाटकी आंब्याची भेसळ झाल्यास तत्काळ अन्न भेसळ नियंत्रण अधिकाऱ्यांना कळवावे, असे मत माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम यांनी व्यक्त केले.
“हापूस आंबा ही कोकणाची शान आहे. त्याच्या नावाखाली इतर फळांची विक्री होणं, हे केवळ फसवणूक नाही तर स्थानिक बागायतदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक धक्का आहे,” असेही मुकादम म्हणाले.
राज्याचे कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही या प्रकरणाकडे जातीने लक्ष दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#हापूसआंबा #रत्नागिरीहापूस #देवगडहापूस #कर्नाटकीआंबा #FruitsFraud #आंबाभेसळ #कोकणहापूस #MangoSeason2025