राजापूर : नदीत पाय घसरून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
रायपाटण येथे परीक्षा संपल्यानंतर हातपाय धुण्यास गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला; परिसरात शोककळा
बातमी मजकूर:
राजापूर (प्रतिनिधी – संदीप शेमणकर) : परीक्षा संपल्यानंतर गावच्या नदीवर हातपाय धुण्यास गेलेल्या नववीच्या विद्यार्थ्याचा पाय घसरून नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १७ एप्रिल) सकाळी राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे घडली.
गंधार अमित पळसुलेदेसाई (वय १५), रा. रायपाटण बागवाडी हा जिजामाता विद्यामंदिरातील नववीचा विद्यार्थी परीक्षा देऊन गावच्या मांडावर मित्रांसोबत खेळायला गेला होता. खेळून झाल्यानंतर नदीवर हातपाय धुण्यास गेले असता, नदीच्या पात्रातील दगडावरून पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत गंधारला पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर गंधारचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आणि सायंकाळी रायपाटणच्या स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी गणपती विसर्जनादरम्यानही अशाच प्रकारे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. गंधारच्या पश्चात आई, मोठा भाऊ, आजी-आजोबा आणि कुटुंबीय आहेत.
हॅशटॅग्स:
#राजापूर #रायपाटण #दुर्दैवीमृत्यू #नदीपात्र #विद्यार्थीमृत्यू #RatnagiriNews #LocalNews















