गुहागर येथील बुधल बागायतदार यांचे कडून धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी शासनाला विनंती
धोका टळावा म्हणून मागणी : बुधल बंदर किनाऱ्यालगत तातडीने धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची गरज
शेजारील भागात बंधारा होत असताना बुधलवासीयांना न्याय का नाही? – ग्रामस्थांचा सवाल
रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील बुधल बंदर येथील किनारपट्टी भागात समुद्राच्या अतिक्रमणामुळे शेकडो नागरिकांचे घर, शेती व बागायती धोक्यात आल्या आहेत. यामुळे किनाऱ्यालगत तातडीने पक्का धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बुधल बंदर परिसरात अनेक वर्षांपासून भातशेती, नारळ व पोफळीच्या बागायती आहेत. किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात घरेही उभारण्यात आलेली आहेत. सन 1981-82 दरम्यान शासनाच्या वतीने काळ्या दगडांचा एक कच्चा बंधारा बांधण्यात आला होता. परंतु सध्या समुद्राच्या वाढत्या अतिक्रमणामुळे हा बंधारा पूर्णतः वाहून गेला आहे. परिणामी किनाऱ्यालगतची जमीन खचू लागली असून घरांना, बागायतींना थेट धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी यासंदर्भात वारंवार संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये तसेच स्थानिक आमदारांकडे निवेदने दिली. मात्र अद्याप कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही, हे विशेष. यावर्षी शेजारील खारवी समाजाच्या वस्तीसमोर मात्र नदी किनाऱ्यावर पक्का बंधारा बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे समुद्रलाटांचा मारा अधिक प्रमाणात बुधल किनाऱ्यावर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बुधल बंदरच्या परिसरातील कोन करून अडूर या हद्दीतील सर्वे नंबर 58 जवळील अंदाजे 500 मीटर लांबीचा पक्का धूप प्रतिबंधक बंधारा तातडीने मंजूर करून बांधण्यात यावा, अशी मागणी बुधल भंडारी समाजाचे बागायतदार व ग्रामस्थांनी केली आहे.
“आमची शेती, आमची घरं समुद्राच्या लाटांनी गिळंकृत होण्याच्या स्थितीत आली आहेत. आमच्या भागाकडे दुर्लक्ष का? आम्हालाही तातडीने धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची गरज आहे,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
हॅशटॅग्स :
#बुधलबंदर #धूपप्रतिबंधकबंधारा #गुहागर #रत्नागिरीबातमी #समुद्रकिनारा #बागायतधोका #रत्नागिरीवार्ताहर
फोट