श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात पार!
चार दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला तवसाळ पंचक्रोशीतील सोहळा; ढोल-ताशांच्या गजरात देवीच्या पालखीचा निरोप
बातमी- Dj sachin
गुहागर तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशीत श्री महामाई सोनसाखळी देवीच्या पालखी महोत्सवाचा पारंपरिक व भक्तिभावपूर्ण उत्सव दिनांक १४ ते १७ मे २०२५ दरम्यान मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. बाबरवाडी, तांबडवाडी विकास मंडळ मुंबई तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव भव्य स्वरूपात पार पडला.
चार दिवस चाललेल्या या महोत्सवात ‘अन्याय’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘ऐतिहासिक बाजी प्रभू’, ‘सम्राट बळीराजा’ यांसारख्या वगनाट्यांसह गण, गवळण, बाल कलाकारांचे सादरीकरण आणि विनोदी फार्स कार्यक्रम सादर करण्यात आले. पेंद्या-सुदामा वाकड्या आणि छोट्या मावशीच्या धमाल गवळणींनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांकडून कलाकारांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. पावसाचे आगमन असूनही नमन कार्यक्रमांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत होता. या कार्यक्रमांचे चित्रिकरण DJ Sachin Kulaye यांच्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.
तवसाळ गाव पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी देवींची पालखी मे महिन्यात देखील उत्साहात काढली जाते, यावरून ‘शिमगा अजून संपलेला नाही’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरले. पालखीने पंचक्रोशीतील तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, मोहिते वाडी, आगर, तांबडवाडी, बाबरवाडी या वाड्यांमध्ये भक्तांच्या घरोघरी जाऊन दर्शन दिले.
पालखी सांगता सोहळ्यादिवशी महिला मंडळ, युवक आणि ग्रामस्थ ढोल-ताशांच्या गजरात, फेटे आणि देवीच्या नावाची जर्सी परिधान करून देवीला निरोप देत नाचले. शेवटी देवी पालखीतून मंदिरात पुनः विराजमान झाली. संजय येद्रे, दीपक जोशी आणि DJ सचिन कुळये यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
कर्दै गावचे गुरव पुजारी परिवार, महिला मंडळ, ग्रामस्थ आणि सर्व मानकरी यांनी भक्तिभावाने सेवा करत उत्सव अविस्मरणीय केला.
हॅशटॅग्स:
#महामाईदेवी #पालखीउत्सव #तवसाळगाव #गुहागर #रत्नागिरीसंस्कृती #DJसचिनकुळये #देवीभक्ती #श्रीसोनसाखळी