सभागृहात ७५% मंत्री गैरहजर, सुधीर मुनगंटीवारांचा संताप; भाजपला घरचा आहेर!
#MaharashtraAssembly #SudhirMungantiwar #MonsoonSession #BJP
मुंबई: महाराष्ट्राच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर, विशेषतः भाजपवर, निशाणा साधला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने आधीच नाराज असलेले मुनगंटीवार सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून चांगलेच संतापले.
शुक्रवारी विधानसभेत त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी अशासकीय विधेयक (Maharashtra Liquor Ban Private Member Bill) मांडले. मात्र, त्यावर उत्तर देण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने मुनगंटीवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “शाळेत विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याला शिक्षा होते, त्याचप्रमाणे सभागृहात ७५ टक्के मंत्री गैरहजर असतील, तर मंत्र्यांना काम करू दिले जाणार नाही, असे अशासकीय विधेयक मांडले पाहिजे,” असे म्हणत त्यांनी भाजपला धारेवर धरले.
मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
मुनगंटीवारांनी केवळ मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरच नाही, तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरही सरकारला घेरले. गुरुवारी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा मिळाल्यानंतरही अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका इंग्रजीत असल्याबद्दल आक्षेप घेतला होता. “मराठी, हिंदी येत नसेल तर ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवून द्या,” अशी मागणी त्यांनी केली होती. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून सरकारने माघार घेतल्यानंतर, मुनगंटीवार यांनी मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे.
भाजपच्याच मंत्र्यावर अप्रत्यक्ष निशाणा
दारूबंदीसाठी आक्रमक असलेले मुनगंटीवार यांनी सार्वजनिक ठिकाणी दारूबंदीची मागणी करणारे विधेयक मांडले. मात्र, संबंधित विभागाचे मंत्री उत्तरातसाठी उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. “जे मंत्री आहेत, त्यांच्याकडून उत्तराची काय अपेक्षा करणार? महाराष्ट्र दारूबंदी विधेयक संमत करण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचे का?” असा उपरोधिक सवाल करत मुनगंटीवारांनी भाजपच्याच एका मंत्र्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ३० जून रोजी अधिवेशन सुरू झाल्यापासून मुनगंटीवार सातत्याने महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधताना दिसत आहेत.