राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन!
नवी मुंबई (मंगेश जाधव, वेळबंकर): महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ साठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २० ऑगस्ट आहे. नोंदणीकृत किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
ही स्पर्धा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर २० जुलैपासून उपलब्ध असून, अर्ज केवळ ऑनलाइन पोर्टलद्वारे २० ऑगस्ट २०२५ पर्यंतच स्वीकारले जातील. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
ही स्पर्धा पूर्णतः निःशुल्क असून, मंडळांनी पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरण, सामाजिक उपक्रम, गडकिल्ले व स्मारकांचे संवर्धन, संस्कृती रक्षण आणि भक्तांसाठी सुविधा यांसारख्या विविध निकषांवर आधारित उपक्रम सादर करून आपला सहभाग नोंदवायचा आहे. समाजाभिमुख कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना गौरवणे आणि प्रोत्साहन देणे हा शासनाचा या स्पर्धेमागे मुख्य उद्देश आहे.
२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयाने गठीत केलेल्या समितीमार्फत मंडळांची स्थळपातळीवर पाहणी केली जाईल. त्यानंतर, मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांतील प्रत्येकी ३ आणि उर्वरित ३२ जिल्ह्यांतील प्रत्येकी १, अशा एकूण ४४ मंडळांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाईल.
स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ₹५ लाख, ₹२.५ लाख आणि ₹१ लाख अशी पारितोषिके देण्यात येतील. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मंडळाला ₹२५,००० रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
#GaneshotsavCompetition #MaharashtraCulture #PublicGaneshotsav #AshishShelar #CulturalAffairs #GanpatiFestival #EcoFriendlyGanesha #नवीमुंबई #गणेशोत्सवस्पर्धा #सांस्कृतिकविभाग #महाराष्ट्र
शासन